Crime News | प्रयागराज : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज पोलीस दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना वाटेत हा गोळीबार झाला, त्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारानंतर पोलीसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटली आहे.
लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे आहेत. लवलेश तिवारी बांदा, सनी हमीरपूर आणि अरुण मौर्य कासगंज येथील मुळ रहिवाशी आहे.
या दोघांवर हल्ला केल्यानतंर या तिघांनी जय श्रीरामच्या घोषण्या दिल्या व त्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर सरेंडर केलं. हल्लेखोर पत्रकार म्हणून घटनास्थळी आले दरम्यान अतिक व अशरफवर समोर येताच त्यांनी 24 फायरींग त्यावर केल्या. त्यामध्ये या दोघांचा जागेवरच जीव गेला.
या घटनेनंतर पोलीसांना या तिघांनी आपला जबाब दिला. यामध्ये पाकिस्तानबरोबर अहमद याचे लागेबंद होते तसेच या दोघांनी व त्यांच्या टोळीने अनेक निरापराधांचा जीव घेतल्याचे जबाबात सांगितले. शिवाय अतीक जमीन बळकवण्यासाठी हत्या घडवून आणायचा तर त्याच्या विरोधात जबाब देणाऱ्यांनाही त्रास द्यायचा. त्याचा भाऊ अशरफदेखील असंच करायचा. म्हणूनच आम्ही दोघांची हत्या केली, असे आरोपींनी आपल्या जबाबात सांगितले आहे.