उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील नमो पार्कच्या प्लॉट मालक व डेव्हलपर्ससह चौघांनी ३५ गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपेश रवींद्रकुमार धिवार (वय-३१, रा. गंगानगर, हडपसर), रोहित गुलाब तुपे (वय-२९, रा. उरुळी कांचन), हरिदास धनराज भन्साळी (वय-५३, रा. उरळी कांचन) आणि मयत प्रतिक बाळासाहेब काळंगे असे गुन्हा झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी नितीन हनुमंत राहुजाडे (वय ४३, रा. गणेश खिंड रोड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील मातोश्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट्सच्या कार्यालयात नितीन राहुजाडे यांनी आरोपींची १९ सप्टेंबर २०२१ ते १७ मार्च २०२२ या कालावधीत भेट घेतली.
त्यावेळी आरोपींनी राहुजाडे यांना सांगितले की, उरुळी कांचन येथील नमो पार्कमध्ये ४२ व ४३ क्रमांकाच्या प्लॉटमध्ये १०१० चौरस फूट बांधकाम असलेले घर आहे. त्यासाठी ४५ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. आरोपींनी राहुजाडे यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस आणि इतर माध्यमातून ४०.८३ लाख रुपये घेतले.
त्यानंतर आरोपींनी त्या जागेच्या ठिकाणी राहुजाडे यांना घर बांधू दिले नाही, तसेच त्याचे उसने घेतलेले पैसेही परत करण्यात आले नाहीत. हरिदास भन्साळी आणि प्रतीक काळंगे आणि त्यांचे साथीदार रोहित तुपे आणि रुपेश धिवार यांनी एकमेकांशी संगनमत करून कट रचला.
आरोपींनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी ही रक्कम लाटण्यात आली आहे. अन्य ३५ जणांकडून लाखो रुपये उकळले आहेत. तसेच या फसवणुकीचा आकडा कोट्यावधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणी राहुजाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.