बारामती : बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानजीक असलेल्या टी पॉइंट हॉटेलमधील युवकास बेदम मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करत बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आदर्श हर्षवर्धन लोंढे, आदित्य विकास लोंढे (दोघे रा. लासुर्णे , ता. इंदापूर ), मयुर अंकुश गायकवाड रा. अंथूर्णे, ता. इंदापुर) अनिकेत सचिन शिंदे (रा लासुर्णे , ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक रतिलाल भिसे (रा. सावळ, ता. बारामती) याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिपक रतीलाल भिसे यांचा लहान भाऊ हेमंत रतीलाल भिसे हा मेडीकल कॉलेज तांदुळवाडी सागर काजळे यांच्या टी पॉइंटवर कामास आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी तो कामावर असताना यातील आदर्श हर्षवर्धन लोंढे, आदित्य विकास लोंढे, मयुर अंकुश गायकवाड, अनिकेत सचिन शिंदे यांनी पाच वर्षापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हेमंत भिसेला हाताने, लाथा -बुक्याने, कमरेच्या बेल्टने तसेच टेबलवरील लोखंडी कुलूप त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यातील एका आरोपीने हेमंत याच्या हातातील व्ही.२९ ई मॉडेलचा मोबाईल जबरीने हिसकाऊन नेला आहे.जखमी हेमंत भिसे याचा भाऊ दीपक भिसे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेतील चौघांवर गुन्हा दाखल केला असून, बारामती तालुका पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे.
दरम्यान सदर मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी फिर्याद दाखल होताच चौघा आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.