भिगवण, (पुणे) : अपघातातील गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती २० हजार रुपये लाच स्वीकारताना भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व वकील यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई पोलीस ठाण्याच्या समोरच रविवारी (ता. २२) दुपारी केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय – ५३) आणि अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे (वय – ३५ रा. मु.पो. मिरजगाव, डाक बंगल्याजवळ, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका ४१ वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची इन्शुरन्सची कागदपत्रे व दाखल गुन्ह्यातील इतर कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. मधुकर कोरडे यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार केली.
प्राप्त तक्रारीची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १५ व १६ ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदार यांना कागदपत्रे देण्यासाठी भिगवन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे व अॅड. कोरडे यांनी ३० हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने रविवारी भिगवन पोलीस स्टेशन समोर सापळा रचला.
दरम्यान, अॅड. कोरडे यांना पीएसआय लोकरे यांच्यासाठी २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर पीएसआय लोकरे यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. दोघांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भिगवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.