पुणे : “तुमच्या मुलाला किंवा तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागली आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे”, अशी बतावणी करून लोणी काळभोरसह पुणे शहर पोलीस दलातील ९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अफताफ उर्फ साजिद अहमद शेख (वय ५२ वर्ष, रा. कमल नयन बजाज हॉस्पिटल फातिमानगर, पुणे) असा या आरोपीचे नाव आहे.
आरोपी सराईत असून एकच पद्धत वापरून पुण्यात किमान दहा ठिकाणी दहा वेगवेगळ्या जणांना फसविले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफताफ उर्फ साजिद शेख हा तूमच्या मुलाला किंवा तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागली आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुमच्या मुलाचा मित्र आहे, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना आपल्या गाडीवर बसून एखाद्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन त्यांची लूट करायचा याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी एका आरोपीला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
शेख कडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने लोणी काळभोर, वारजे, निगडी, वाकड, देहू रोड, चंदन नगर, कोंढवा, भारती विद्यपीठ, सिंहगड रोड अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वृद्धांना गंडा घातल्याची पोलिसांना माहिती दिली. आरोपीकडून १५ तोळे सोनं, १ बुलेट जप्त करण्यात आली आहे. आरोपीने पुण्यात ९ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याच निष्पन्न झाले असून पोलिस या आरोपीने असे अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत.
दरम्यान, आरोपीकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपये किमतीची बुलेट असा जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिंहगड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर केल असता कस्टडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत.