पुणे : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वत:च्याच हाताने कटरने गळा चिरुन घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे घडली आहे. शुक्रवारी (ता. १६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
महेश राजाराम तवंडे (वय-३२ रा. ओम नम: सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, मुळ रा. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता सिंहगड रोड पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा पुण्यात ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करत होता. गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. गणपती उत्सवासाठी त्याची मैत्रीण बाहेर गावी गेल्यानंतर महेशने टोकाचे पाऊल उचलले.
महेश याने शुक्रवारी दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करुन घेत स्वत:च्याच हाताने शरीरावर आणि गळ्यावर कटरने वार केले. दुपारी घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला मात्र तरुणाच्या घरातून नेहमीच ओरडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात माहिती दिली.
दरम्यान माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव आणि इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहेत.