पुणे : रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एकाने ट्रॅफिक वार्डनच्या अंगावर गाडी घालून मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हंसराज दगडू ठाकरे (वय ३८, रा. पंचरत्न कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शरद जयहिंद बंडगर (रा. रहाटणी फाटा, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद बंडगर व त्यांचे सहकारी दशरथ शिवाजी खरटमल हे दोघेही चिंचवड मधील जुना जकात नाका चौक येथे शाळेच्या मुलांना ये-जा करण्यासाठी सोईस्कर व्हावे, यासाठी येथे वाहतूक नियमनासाठी हजर होते. यावेळी हंसराज ठाकरे याने त्याची गाडी जकात नाका चौकात पुलाखाली रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे बंडगर यांनी गाडी काढण्यास सांगितले असता गाडी पुढे घेत नाही, काय करायचे ते कर असे म्हणाला.
दरम्यान, यावेळी बंडगर यांनी गाडीचा फोटो काढल्याने आरोपीने त्यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, यांनी बाजूला उडी घेतल्याने बचावले. त्यानंतर आरोपी गाडीतून उतरून बंडगरजवळ आला. शिवीगाळ करीत आमच्या गाडीचा फोटो का काढला असे म्हणत शर्टची कॉलर पकडून हातातील कड्याने तोंडावर मारले. त्यामुळे तोंडाला दुखापत झाली. त्यानंतर हातानेही मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.