लोणी काळभोर, (पुणे) : आठवडे बाजारात चोरी करून मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. १६) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान येथून ताब्यात घेतले आहे.
संदीप दिगंबर जाधव (वय-२५, रा. खुळेवाडी, चंदननगर, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर आठवडे बाजारात १९ जूनला एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाले होते.
याबाबत मुलाचे नातेवाईक सरूबाई मच्छिंद्र कुसनरे वय-२४ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी एक महिला आरोपी सोजाराबाई दिगंबर जाधव (वय-५०, खुळेवाडी, चंदननगर, पुणे) हिला ताब्यात घेतले होते. तर तिचा साथीदार हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता.
सदर घटनेचा तपास पोलीस अंमलदार संतोष होले करीत असताना त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि सदर चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी हा उरुळी कांचन या ठिकाणी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष होले यांनी सदरची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे व पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान येथून पोलीस अंमलदार संतोष होले व पोलीस नाईक संतोष अंदुरे यांनी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष होले करीत आहेत.