पुणे : एक कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर तुला आणि कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याचा शिरूर पोलिसांनी अवघ्या ७२ तासात पर्दाफाश केला.
शिरूर शहरातील वैभव खंबीया यांना ४ जुलै रोजी फोनवरून खंडणीची धमकी आली होती. dk ग्रुप मधून बोलत असल्याचे खंडणी खोर सांगत होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.
तपास पथकाने आपआपले गुप्त बातमीदारांची मदत घेवून सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी राहुल सुखदेव गायकवाड (रा. कोहोकडी ता. पारनेर जि. अहमदनगर) याने केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला.तो लोहगाव पुणे परीसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावर लोहगाव परीसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून राहुल सुखदेव गायकवाड यास ताब्यात घेतले.
आरोपी राहुल गायकवाड याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, त्याला खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा हा पैश्यांच्या गरजेपोटी केल्याचे सांगितले. एका वारकरी व्यक्तीचा मोबाईल चोरून त्याने त्यावरून या धमक्या दिल्या. तसेच त्याचेवर यापुर्वी पारनेर, सुपा, श्रीगोंदा, शिरूर, शिक्रापुर पोलिस स्टेशन ठिकाणी एकुण नऊ गुन्हे दाखल असून तो सध्या शिक्रापूर, श्रीगोंदा पोलिस स्टेशनकडील एकूण चार गुन्हयात दीड वर्षांपासून फरार होता.