पुणे : पुण्यात खऱ्या मालकांना पत्ता नसतानाही ”नंदनवन” इमारतीची २० वेळा परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आली आहे. पुन्हा तीच इमारत विकण्यासाठी आलेल्या नागरिकांचा दुय्यम निबंधक अधिकारी दत्तात्रय सातभाई यांना संशय आल्याने सदर घटनेचा भांडाफोड झाला आहे.
अंजली सत्यदेव गुप्ता (वय़-७५), नीरू अनिल गुप्ता (वय-६५), किरण देवेंद्र चढ्ढा (वय-५८) आणि सुमन अशोक खंडागळे (वय-६५) अशी फसवणूक झालेल्या वृद्ध महिलांची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी दत्तात्रय सातभाई यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ब्रोकर आणि ज्या बनावट व्यक्ती मालक म्हणून फसवणूक करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील ४ जेष्ठ महिलांनी पुण्यातील कोंढवा भागात शीतल पेट्रोल पंपसमोर जागा घेतली होती. त्यांनी त्या जागेवर २००५ मध्ये चार मजली नंदनवन नावाची इमारत बांधली. जेष्ठ महिलांनी सदर इमारत विकण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी ओळखीच्या प्रॉपर्टी एजंटला यासंदर्भात माहिती दिली. विक्रीच्या व्यवहारासाठी एजंटसोबत त्यांनी इमारतीचे कागदपत्र, खरेदीखत, लाईट बिल, चौघींचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, चारही फ्लॅटचे कागदपत्र यांच्या झेरॉक्स कॉपी शेअर केल्या. त्यानंतरच या प्रॉपर्टीवरच्या फसव्या आणि खोट्या व्यवहारांच्या चक्रांना सुरुवात झाली.
त्यानंतर, एजंटांनी साधारणपणे मागच्या वर्षी जुलै महिन्यापासून खोटे व्यवहार करण्यास सुरुवात झाली. या प्रॉपर्टीचे एका वर्षात ४ पेक्षा जास्त वेळा व्यवहार झाले आहेत. यामध्ये खरेदी-विक्री आणि तारण ठेवणे अशा व्यवहारांचा समावेश आहे. काही वृत्तपत्रांनी केलेल्या पडताळणीनुसार तर या इमारतीचे एका वर्षात असे जवळपास २० व्यवहार झाले आहेत. असे सांगितले आहेत.
दरम्यान, सह दुय्यम निबंधक दत्तात्रय सातभाई यांना हवेली उपनिबंधक कार्यालयात इमारतीच्या मालक महिलांची बनावट कागदपत्र तयार करून फेब्रुवारी महिन्यात दस्तनोंदणी केली होती. त्याच महिलांना घेऊन पुन्हा त्याच प्रॉपर्टीचे नवीन दस्त नोंदणीसाठी आले होते. त्यामुळे या प्रकरणाची शंका आली. शंका आल्यावर फेब्रुवारी महिन्यातल्या नोंदणीचे कागदपत्र आणि त्या दिवशीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यांनी याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याबाबत बोलताना दुय्यम निबंधक दत्तात्रय सातभाई म्हणाले कि, ”नंदनवन” इमारतीची खरेदी-विक्री झालेल्या नोंदणीची पडताळणी केली असता, बनावट कागदपत्रांनी ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, भोगवटा प्रमाणपत्र यांचा वापर करुन जवळपास ३ कोटी ७० लाख रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे उघडकीस आले आहे.
मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक मदन कांबळे यांनी सांगितले कि, “आम्हाला जे कागदपत्र मिळाले त्यावरुन इमारतीची बनावट मालकी दाखवून 1.42 कोटींचं कर्ज एका बँकेकडून उचलण्यात आलं. ही रक्कम दोन भागांमध्ये बनावट मालकी दाखवणार्यां महिलांच्या खात्यात जमा झाली. ज्या बनावट महिला आहे त्यांनी मुळ मालकांच्या नावाने लोन काढलं आहे. अजून एका बँकेचं लोन त्यांना सँक्शन झालं होतं. पण ते पैसे बँकेकडून रिलिज झाले नाही,”
नंदवन इमारतीच्या ४ जेष्ठ महिला मालकीण म्हणाल्या कि, “हा सगळा प्रकार आमच्यासाठी फारच धक्कादायक आहे. आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही ज्येष्ठ महिला आहोत. असे काही समोर येईल. असा आम्ही कधीही विचार केला नव्हता,