पुणे : शिरोली तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुण्याचा पोलीसांनी छडा लावला असून हा खून गतिमंद मुलाने केला नसून त्या महिलेच्या पतीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबर रोजी तंबाखू खाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली होती. यात अंजनाबाई बारकु खिराली (वय ६०) यांचा खून झाला होता. यावेळी पोलिसांनी मयत महिलेचा मुलगा असणाऱ्या अमोल बारकू खिलारी याला ताब्यात घेतले होते. याबाबत महिलेचे पती बारकू सखाराम खिलारी यांनी पोलीसात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी या खुनाचा तपास करताना अधिक खोलात चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी मयत महिलेचा पती बारकु यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळून आली. त्यावेळी आरोप करण्यात आलेला मुलगा देखील गतिमंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विनोद धूर्वे यांनी पोलिसी खाक्या दाखविताच बारकुने आपणच खून केल्याचे मान्य करत याचा कबुली जबाब देखील दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारकुवर कर्ज झाल्याने त्याला येथील जमीन विकून दुसरीकडे स्थलांतरीत व्हायचे होते. यावरून या दोन्ही पती पत्नीत सातत्याने वादविवाद होत होते. १५ नोव्हेंबर रोजी देखील अशाच वादात बारकु याने मयत महिलेला विळा फेकून मारला. तो विळा थेट महिलेच्या तोंडाला लागल्याने भांडण आजून पेटले. विकोपाला गेलेल्या भांडणात बारकुने अंजनाबाई यांच्या डोक्यात खोरे घालून त्यांचा खून केला. यावेळी आपला मुलगा गतिमंद असल्याने ‘तू पोलिसांना मीच सर्वकाही केले असे सांग, बाकी मी सांभाळून घेतो’ असे म्हणत बारकु कपडे घालून बाहेर निघून गेला आणि मुलानेच खून केला असल्याचा बनाव केला.
पोलीस तपासाअंती पती बारकु सखाराम खिलारी यानेच खून केला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करत आहेत.