पुणे : सराफाच्या घरात काम करीत असताना बनावट चाव्यांचा वापर करून चार महिन्यांत सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा, हिरे, रोकड असा दीड कोटी रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या नोकरासह नऊ जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने ताब्यात घेतले आहे. नोकराने चोरलेले सोन्याचे दागिने खरेदी करणारा सोनार व त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सारिका अप्पासाहेब सावंत (सध्या रा. काळेपडळ, हडपसर), भावना रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा), जनार्दन नारायण कांबळे (रा. शाहूनगर, सांगली), दुर्गाचरण रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी हे सोने सोनार प्रवीण पोपट दबडे, प्रीतम पोपट दबडे व त्यांचा साथीदार महेश महादेव भोसले (सर्व रा. ढालगाव, कवठे महांकाळ, सांगली) यांना विकल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंदू बालाजी मेंडेवाढ (वय ३४, रा. पांढुरणा, नांदेड) असे या नोकराचे नाव आहे.
याप्रकरणी नीष धनराज साखरिया (वय ४८, रा. मुकुंदनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीष धनराज साखरिया यांचे सोन्या मारुती चौकात सराफी पेढी आहे. गेल्या सात वर्षांपासून चंदू त्यांच्याकडे घरकाम करतो. त्यांनी दुकानातील दागिने, पत्नीचे दागिने तसेच मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिने घरातील कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते.
लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच्या दिवशी २४ ऑक्टोबरला त्यांनी कपाटातील दागिने बाहेर काढले असता, त्यातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, चांदीच्या विटा, रोकड आणि पत्नीचे घड्याळ असा दीड कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने त्यांनी स्वारगेट पोलिसात तक्रार दिली होती.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक एककडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाने घरातील नोकर चंदूची चौकशी केली. या चौकशीत त्याने गुन्हा कबूल करून चोरलेले दागिने व रोकड इतर साथीदारांना दिल्याचे सांगितले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरील सर्वांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या सोनारांकडून २२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदराची कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांच्या पथकाने केली.