पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती १० दिवसात करा. अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी कारवाईला सामोरे जा. असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी नियमितपणे या रस्त्यावरून प्रवास करतात, त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असे सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
राजगुरुनगर ते आळे फाटा (पुणे जिल्हा हद्द) दरम्यान पर्यायी रस्त्याची कामे आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे आणि सर्व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती येत्या दहा दिवसांत पूर्ण न केल्यास त्या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाइल क्रमांकाचे फलक लावले जातील.
दरम्यान, कंत्राटदार रस्त्याची देखभाल व दुरुस्तीसह कामांचे पैसे घेतात, तर मग काम जबाबदारीने करायला हवे. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर संबंधित कंत्राटदाराने गस्तीची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी सूचनादेखील कोल्हे यांनी केली आहे.