रांजणगाव गणपती : गणेगाव खालसा (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील कामिनी ओढ्यामध्ये केमिकल सोडणाऱ्या आरोपीला, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. ही माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
किशोर दशरथ मोरे (वय 36, धंदा, ड्रायव्हर, रा. भेकराईनगर, हडपसर ता. हवेल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला तपास पथकाने बुधवारी (ता. 17) ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता 20 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 11 जुलै) रात्रीच्या सुमारास गणेगाव खालसा गावच्या हद्दीतील कामीनी ओढ्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी केमिकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दुषित झाले होते. त्या केमिकलमुळे पाण्याचा रंग लालसर होऊन सदर पाण्यामुळे मानवी व प्राणी जिवितास धोका निर्माण झालेला होता. याबाबत गणेगाव खालसाचे ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ या निरांजन एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.
केमिकल युक्त पाणी कामीनी ओढ्यातुन पुढे कोंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंढापुरी तलावातील पाणी आजुबाजुच्या रांजणगाव गणपती, शिक्रापूर, खंडाळे, गणेगाव खालसा या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने सदर प्रकरणांची पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.
सदरच्या दुषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपुन, मासे मरण पावले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेचा पोलीस तपास घेत असताना गोपनिय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी हा रेल्वस्टेशन येथुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढला.
दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने त्याच्याकडील टॅन्करमध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील नामांकित कंपनीमधून 9 जुलै रोजी 35 टन हायड्रोक्लोरीक ॲसिड भरुन ते सुखा केमिकल कंपनी, बडोदरा, गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते. परंतु सदरचे केमिकल हे संबंधित कंपनीमध्ये खाली न करता गणेगाव हद्दीतील कामिनी ओढ्यातील पाण्यामध्ये सोडुन दिले आहे. तसेच ॲसिड हे सुखा केमिकल कंपनीमध्ये जमा केल्याची बनावट पावती तयार करुन संबधित कंपनीस पाठविली होती. त्यानुसार सदर दाखल गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे काय, यापुर्वी असा प्रकार कोठे केला आहे काय, याबाबत पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, संदिप जगदाळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडकेन हे करत आहेत.