थेऊर, (पुणे) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील, थेऊरफाटा- थेऊर रस्त्यावरील, दत्तनगर येथील रस्त्याला 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. 19) सकाळी मान्यवरांच्या हस्ते करून, रस्त्याचे कामही सुरु करण्यात आल्याची माहिती, थेऊर ग्रामपंचायतचे सदस्य युवराज काकडे यांनी दिली.
मागील अनेक वर्षापासून या परिसरात राहणारे नागरिक, रस्त्यासंदर्भात पाठपुरावा करत होते. याच अनुषंगाने युवराज काकडे यांनी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा नियोजन समितीमधून, 20 लाख रुपये कॉक्रीटीकरणासाठी, तर 20 लाख रुपये डांबरीकरणासाठी मंजूर केले आहेत. असा एकूण तब्बल 40 लाख रुपयांचा निधी सदर रस्त्यासाठी मंजूर झाला आहे.
थेऊरफाटा- थेऊर रस्त्यालगत असणारा हा दत्तनगर येथील रस्ता, प्रचंड रहदारीचा रस्ता झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून लोकवस्ती वाढली आहे. यापूर्वी येथील 25 टक्के रस्त्याचे काम तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या निधीतून 5 वर्षांपूर्वी झाले होते. तर उर्वरित राहिलेला रस्ता प्रचंड खराब झाल्याने, पावसाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरीकांना याचा लाभ होऊन, रस्त्याची समस्या कायमस्वरूपी संपणार आहे.
दरम्यान, दत्तनगर येथील नागरिकांची, रस्ता करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी असल्याने, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी आपल्या स्वतःच्या 6 नंबर प्रभागातील गटार लाईनसाठी मंजूर झालेला, 20 लाख रुपयांचा निधी 1 नंबर प्रभागातील, दत्तनगर येथील रस्त्याला दिल्याने येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करुन कौतुक केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, राहुल कांबळे, संजय काकडे, संतोश काकडे, गणेश गावडे, माजी सदस्य गोविंद तारू, गणेश रसाळ, नवनाथ कुंजीर, संतोष कुंजीर, पांडुरंग काकडे, किरण काकडे, मिथुन तारू, शंकर झेंडे, रामभाऊ काकडे, अजय काकडे, प्रथमेश काकडे, दिपक काकडे, हेमंत कांबळे, ओंकार तारू, शिवशंकर स्वामी, प्रकाश आळंदे, अर्जुन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.