– विजय लोखंडे
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघोली येथे, वाघेश्वर चौकासह महत्वाच्या ठिकाणी भुयारी मार्ग, स्कायवॉक किंवा अन्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश दाभाडे यांनी पुणे मनपा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली येथे रोजच्याच वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतूक यामुळे पुणे-नगर महामार्गावर अनेकांना अपघातांमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूने शाळा असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. विद्यार्थी घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात. गेली अनेक वर्षांपासून मागणी होत असताना सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
विद्यार्थ्यांसह जेष्ठ व महिलांना सुद्धा रामभरोसे रस्ता ओलांडावा लागत आहे. यापूर्वी सुद्धा सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक अथवा तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्यांनी एनएचआयकडून प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असताना मध्येच काही प्रोसेस करता येणार नसल्याचे सांगितले होते.
उड्डाणपूलाचे काम सुरु व्हायला अजून बराच अवधी आहे. अजून किती जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल अशी तीव्र भावना दाभाडे यांनी व्यक्त केली. विद्यार्थी, जेष्ठ, महिला, विकलांग बांधव यांच्यासाठी तरी रस्ता ओलांडण्यासाठी तापुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गणेश दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर असंख्य पालकांच्या सह्या देखील आहेत. पीएमआरडीए क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय सहा. राहुल पवार यांना निवेदन देण्यात आले असून वरिष्ठांना याबाबत कळवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.