लोणी काळभोर, (पुणे) : अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली असली तरी काही ठिकाणी त्याचे सांगाडे धोकादायकरीत्या तसेच आहेत ते तत्काळ दूर करावेत. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या क्षेत्रांची माहिती घ्यावी आणि त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. मात्र पुणे – सोलापूर महामार्गावर तसेच पुणे -नगर मार्गावर सांगाडे धोकादायकरित्या उभारलेल्या अवस्थेत आहेत. या लोखंडी सांगाड्यावर संबंधित विभाग कारवाई करणार का? जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार अशी चर्चा सध्या पूर्व हवेलीत रंगू लागली आहे.
अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली असली तरी काही ठिकाणी त्याचे सांगाडे धोकादायकरित्या तसेच आहेत ते तत्काळ दूर करावेत. जुन्या इमारती, पूरप्रवण क्षेत्र आणि वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या क्षेत्रांची माहिती घ्यावी आणि त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवाशी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते सोलापूर या दरम्यान, महामार्गावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स जानेवारी 2024 ला काढले होते. मात्र, एनएचआयचे काम पुढे जाताच, पाठीमागे महामार्गावर अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले. त्यामुळे पुन्हा पुणे-सोलापूर महामार्ग अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सच्या विळख्यात सापडला आहे. सर्व यंत्रणांनी जीवित हानी रोखण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले होते. मात्र अद्यापपर्यत पूर्व हवेलीत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जातात…
एका बाजूला अनधिकृत जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकाचौकात लाकडाचे पहाड बांधून धोकादायकरित्या जाहिरातीचे पोल उभारले जात आहेत. काही ठिकाणी तर पथदिव्यांच्या खांबांवर हीटलेस बांधले आहेत. परंतु, याकडे कारवाईच्या नावाखाली प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविले जात आहेत.
कारवाई कधी?
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेल्या आहेत. या धोकादायकरीत्या लावलेल्या होर्डिंग्जमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार का ? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.