पुणे : वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेला रामराम करुन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाला महिना उलटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचीही साथ सोडत थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे. येत्या ९ जुलैला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात उबाठा पक्षात प्रवेश करणार असल्याचं वसंत मोरे यांनी पुण्यात बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मतदार आणि कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही असा गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं. त्यामध्ये माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते, असंही वसंत मोरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला त्यामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या, मराठा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहण्यात आलं. तर मराठा मतदारांनीही वंचितचा उमेदवार म्हणून मला स्वीकारलं नाही. तसेच माझ्या पाठिमागे जे लोक आहेत, त्यांचा विचार करावा लागतो. वंचितच्या काही ठराविक कार्यकर्त्यांनी माझं काम केलं. सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी मला वेळ दिला, असं मोरे म्हणाले.
दरम्यान, माझ्यासोबत जे खरे वंचितचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझ्याविरोधात बोलणारे कार्यकर्ते कुठे होते हे माहित आहे. बाळासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी ताकद वापरायला हवी. उगाच काहीतरी करायचे त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअपवर पोस्ट करायची त्यातून पोलिसांवरचा ताण वाढतो.
मी बाळासाहेब आंबेडकरांना स्वत: मेसेज केला. २०१८ ला वंचितची स्थापना झाली, ज्यांच्या खांद्यावर पुण्याची जबाबदारी दिली. त्यांनी संघटना वाढीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. ही खदखद वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. संघटनावाढीसाठी फेरबदल करावा असं मी प्रकाश आंबेडकरांना म्हटलं होते, असंही वसंत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.