पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेला विशाल अग्रवाल याचा पाय आणखी खोलात गेला आहे. बावधन (खु) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालं याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल अडसुळ यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, येरवडा कारागृहात असलेला विशाल अग्रवाल याला अटक करून मंगळवारी (दि. २) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला 5 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विशाल अग्रवाल याला न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले की, अग्रवाल हा बांधकाम व्यावसायिक असून त्याने ७२ सदनिकाधारकांना सोसायटीसाठी कव्हर पार्किंग, ओपन स्पेस, अॅमिनिटीज या सुविधांचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळी रक्कम घेऊन सुविधा न देता फसवणूक केली.
अग्रवाल व त्यांच्या अन्य साथीदारांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या जागेमध्ये इतर इमारती बांधून सदनिकाधारकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अग्रवालकडे सखोल तपास करायचा आहे. सोसायटी बांधकाम करताना मंजूर नकाशा व त्यानंतरच्या नकाशामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला आहे.
सोसायटीधारकांना मानीव अभिहस्तांतरण करून देणे बंधनकारक असतानाही ते करून देण्यास टाळाटाळ केली. यामागे त्यांचा हेतू काय होता? ७२ सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचे काय केले? तसेच अन्य मुद्द्यांचा तपास करायचा असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी जाधव यांनी केली.
नेमकं प्रकरण काय ?
नॅन्सी ब्रम्हा असोसिएटस् या प्रकल्पाचे विकसक असलेला विशाल अग्रवाल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी ७२ सदनिका धारकांनी सदनिका व अन्य सोयीसुविधा ठरल्याप्रकारे रक्कम देऊन व्यवहार केला. यामध्ये त्यांना नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. चे मालकीची असणारी पार्किंगची जागा, अॅमिनिटीजची जागा, ओपन स्पेस सोसायटीला देणे, तसेच कनव्हेन्स डीड करून देणे बंधनकारक होते.
परंतु सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता विशाल अग्रवाल आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी विशाल अडसुळ यांच्या सोसायटीच्या मालकीच्या जागेवर वॅन्टेज टॉवर व वॅन्टेज हाय या २ इमारती उभारल्या. यात प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणी अॅमिनिटी स्पेस, मोकळी जागा नकाशामध्ये दर्शवून तसेच नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर केले.
सोसायटीच्या जागेत वेंन्टेज टॉवर या अकरा मजली इमारतीत ६६ व्यावसायिक कार्यालये बांधली. तर वॅन्टेज हाय या १० मजली इमारतीमध्ये २७ सदनिका आणि १८ दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. सोसायटीमधील सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.