यवत : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवार (दि. 03 जुलै ) मुक्कामासाठी दौंड येथे येत असून या सोहळ्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी झाली आहे. दौंड येथे पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. पहिला मुक्काम यवत तर दुसरा मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे.
दौंड तालुक्याच्या सीमेवर उद्या बुधवारी (दि.02) सायंकाळी चारच्या सुमारास पालखीचे आगमन होत आहे. पालखी सोहळा व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी यवत व वरवंडकडून जय्यत तयारी सुरु आहे. तयारीचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली जात आहे.
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी मुक्कामी असून तालुका प्रशासनाबरोबरच यवत ग्रामपंचायत प्रशासन आणि संपूर्ण ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या तयारीत व्यस्त आहे. ग्रामस्थांकडून पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी पिठलं -भाकरी जेवणाची व्यवस्था केली जाते. गावातील शाळेच्या मैदानात, गुंड मैदान, दोरगेवाडी, यवत स्टेशन आधी परिसरात दिंड्या मुक्काम करतात. तेथील जागांची स्वच्छता, दिवाबत्तीची सोय याबरोबरच 17 ठिकाणी 1200 मोबाईल स्वच्छता गृहाची व्यवस्था, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात एकाचवेळी 400 मोबाईल चार्जिंगच्या सुविधा, सुमारे 19 ठिकाणी मोफत टँकर भरण्याची व्यवस्था, परिसरातील सर्वच विहिरीमध्ये टी सी एल टाकून पाणी शुध्दीकरण, आवश्यक त्या ठिकाणी कचरा कुंड्याची व्यवस्था, 4 मंगल कार्यालय उपलब्ध करण्यात आले. मंदिर , प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत परिसरात एकाच वेळी 1 हजारहून अधिक भाविकांच्या स्नानांची सोय, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, हरीत वारीच्या अनुषंगाने गावाच्या परिसरात झाडे लावण्याचे नियोजन, पालखी रस्ता आणि परिसरात विद्युतीकरण, विद्युत रोषणाई आदि सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. दिंड्यासाठी विविध ठिकाणी शाळेच्या जवळपास 40 खोल्या व 3 ठिकाणी गॅसची व्यवस्था करण्यात आली आहे.
कालभैरवाथ मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व पंचायत समिती कडून आरोग्यकक्ष उभारण्यात येत आहे. पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य कर्मचारी, ऍम्ब्युलन्स यांची देखील तयारी करण्यात आली असल्याची माहिती यवतचे सरपंच समीर दोरगे आणि ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी दिली.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी दोन दिवस दौंड तालुक्यात असल्याने यवत पोलीस प्रशासनाने यवत आणि वरवंड तसेच दौंड तालुक्याच्या हद्दीपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन दिवस पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. पालखी सोहळ्याच्या बंदोबस्त साठी यवत पोलीस ठाणे आणि प्रशासन सज्ज झाले आहेत. 1 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 17 पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 200 महिला पोलीस यांसह 800 हुन अधिक अंमलदार, 250 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या, दंगल नियंत्रक पथके यांसह एनसीसीचे विद्यार्थी असा सुमारे 1500 हून अधिक पोलीस आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवक संस्थेची पथके असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
महामार्ग प्रशासनाची तात्पुरती डागडुजी
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी उद्या बुधवारी (दि.02 जुलै) यवत मुक्कामी येत आहे. आज दुपारपर्यंत महामार्ग प्रशासनाने किरकोळ ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सुरु केले. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, प्राथमिक शाळा परिसरात पाणीसाठा होत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.