इंदूर : इंदूरमध्ये एका बाल आश्रमात ४८ तासात ३ मुलांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर १२ मुलांना उलट्या आणि जुलाब झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना मल्हारगंज पोलिस स्टेशन हद्दीतील ‘श्री युगपुरुष धाम’ या बालआश्रमात रविवार ते मंगळवार या 48 तासांत घडली. शुभ (वय-8), करण (वय-12 वर्षे) आणि आकाश (वय-7 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिका-यांनी सांगितले की, बाल निवारागृहांमध्ये विविध भागातून मुले आणली जातात. यामध्ये अनाथ आणि मानसिक समस्यांनी ग्रस्त मुलांचा समावेश आहे. तीन बालकांच्या मृत्यूवरून गोंधळ झाल्यानंतर प्रशासनाच्या विविध विभागांचे संयुक्त पथक बालगृहात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या प्रकारांची तपासणी केली. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिन्ही मुलांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ADM) राजेंद्र सिंह रघुवंशी यांनी पत्रकारांशी सवांद साधला यावेळी ते म्हणाले की, एकूण 204 मुलांना बाल निवारागृहात ठेवण्यात आले होते, त्यापैकी गेल्या 48 तासांत ३ मुलांचा मृत्यू झाला आहे.