– विजय लोखंडे
वाघोली (पुणे) : पुणे महानगरपालिकेच्या सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात वाघोली मधील रस्ता, सांडपाणी, पिण्याचे पाणी आदी कामांचा समावेश करण्यात आला. जवळपास 13 कोटी 40 लाख रुपयांचा निधी हा प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वाघोलीचे माजी सरपंच रामभाऊ दाभाडे, उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी दिली.
माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी सांगितले की, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार जवळपास पाच कोटी 43 लाख रुपयांच्या विकास कामांचा मनपा प्रशासनाने अर्थसंकल्पात समावेश केला आहे. वाघोलीच्या विकासात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे योगदान असल्याचे रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, आमदार राहुल कुल, प्रदीप कंद यांनी देखील निधी मिळवून देण्यासाठी मोलाची मदत व सहकार्य केले आहे, असे दाभाडे यांनी सांगितले.
केसनंद रोड ते हिल शायर सोसायटी रस्ता करण्यासाठी 40 लाख रुपये, बायएफ रोड-कांचनपुरम सोसायटी ते फकिरबाबा वाडा रस्ता करण्यासाठी 30 लाख रुपये, वाघेश्वर मंदिर ते दशक्रिया विधी घाट पर्यंत दगडी फरशी टाकण्यासाठी 40 लाख रुपये, बकोरी रोड ते न्यात्ती सोसायटी, जेएसपीएम कॉलेज रस्ता करण्यासाठी 80 लाख रुपये, म्हसोबा मंदिर ते गुलमोहर प्राईमरोझ सोसायटी रस्ता करण्यासाठी 30 लाख रुपये, ओझोन व्हीला सोसायटी ते डिकॅथलॉन मेन ड्रेनेज लाईन करण्यासाठी 2 कोटी 73 लाख रुपये, खराडी ते साईसत्यमपार्क पर्यंत पिण्याचे पाणी पाईपलाईन करण्यासाठी 50 लाख रुपये, वाघेश्वर चौक ते बायएफ रोड सर्विस रस्ता करण्यासाठी 80 लाख रुपये, वाघोली परिवहन मंडळाच्या केसनंद फाटा बीआरटी बस स्थानकात रस्ता व इतर कामे करण्यासाठी 80 लाख रुपये, वाघोली गावठाण ते बकोरी फाटा रस्ता विकसित करण्यासाठी साडेचार कोटी, वाघोली ते आय व्ही स्टेट कडे जाणारा अंतर्गत रस्ता विकसित करण्यासाठी एक कोटी 80 लाख रुपये, वाघोली येथील प्रकाश दिवे व्यवस्था करण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये.. आदी विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. वाघोली करांनी या निधीचे स्वागत केले असून दाभाडे व भाडळे यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.