दक्षिण कोरिया : दक्षिण कोरियातील बॅटरी प्लांटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २३ नागरिक बेपत्ता आहेत. ही घटना सोलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग येथील लिथियम बॅटरी उत्पादक एरिसेलच्या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी बेपत्ता लोकांचा शोध आणि सुटका करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिथियम बॅटरी प्लांटला आग लागल्यानंतर २३ नागरिक बेपत्ता आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी २१ परदेशी नागरिक असून यामध्ये चिनी नागरिकांचाही समावेश आहे. या आगीत कर्मचाऱ्यांची दैनंदिन यादीही नष्ट झाली, त्यामुळे मृतांचा खरा आकडा कळू शकला नाही, असे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सोलच्या दक्षिणेस ४५ किलोमीटर अंतरावर ह्वासेओंग येथील लिथियम बॅटरी निर्मात्या एरिसेलच्या प्लांटमध्ये सकाळी साडेदहा सुमारास आग लागली होती. ती आग अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणली. तसेच प्लांटमध्ये जाऊन मृतदेह बाहेर काढले. ३५,००० युनिट्स असलेल्या प्लांटमध्ये बॅटरी सेल युनिटच्या स्फोटामुळे ही आग लागली. मात्र, हा स्फोट कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली तेव्हा कंपनीत ६७ लोक काम करत होते.