गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : लोकसभेच्या निवडणुकीत डोर्लेवाडीतील सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. माझ्यावरील प्रेम आणि सुप्रियाताई वरील विश्वास आपण मतदान रुपी करून दाखवला असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वासर्वे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
डोर्लेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. 19) शेतकरी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युगेंद्र पवार होते.
यावेळी तालुका अध्यक्ष एस. एन. जगताप, बारामती तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस रुपाली लोणकर, बारामती तालुका अल्पसंख्यांक युवक उपाध्यक्ष पोपट मोरे, डोर्लेवाडीचे सरपंच सुप्रिया नाळे, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, सुरवातीपासून ते आजपर्यंत डोर्लेवाडीमध्ये खूप बदल झाला आहे. सुरवातीला लंडनवरून गाई बारामती येथे आणल्या. 200 लिटर दूध संकलनापासून सुरवात झाली ते आज बारामतीमध्ये जवळजवळ 12 लाख लिटर दुध उत्पादन होते.
या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेवरून डायनिक्स कंपनी येथे सुरु केली. या ठिकाणी बनणाऱ्या दुध पावडर पासून चॉकलेट बनवनवण्याच्या चार कंपन्या बारामतीत आहेत. त्यामुळे बारामती मतदार संघातील जनतेला सांगाव लागले नाही कोणतं बटण दाबायचे.
दरम्यान, शैक्षणिक क्षेत्रात ही आपली बारामती अग्रेसर आहे. सुरवातीला महाराष्ट्रात दोन इंजिनिअरिंग कॉलेज होते, अशी परिस्थिती असताना आज आपल्या बारामतीमध्ये तीन इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. सुप्रिया सुळेंचे कौतुक करत म्हणाले, संसदेमध्ये 98 टक्के उपस्थिती असणाऱ्यांपैकी चार खासदारांपैकी सुप्रिया ताई या एक आहेत, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.