उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात एक चारचाकी गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिक्रापूर येथील एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून दोघांची परिस्थिती नाजूक आहे.
उरुळी कांचन -जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असुन यामध्ये एका १४ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. शहाजी रंगनाथ डफळ (वय- ४०), कामिनी शहाजी डफळ (वय- ३५), शांभवी शहाजी डफळ (वय – १४, रा. तिघेही शिक्रापूर, ता. शिरूर) असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. या अपघातात शहाजी व त्यांची पत्नी कामिनी डफळ या गंभीर जखमी असून मुलगी शांभवी ही किरकोळ जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी रंगनाथ डफळ हे शिक्रापूर येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळी पत्नी व मुलगी यांच्यासह जेजुरीकडून उरुळी कांचनच्या दिशेने निघाले होते. यावेळी शिंदवणे घाटात वळणावर आले असता त्यांचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर चारचाकी ही जागीच पलटी झाली.
या घटनेत चालक शहाजी डफळ व त्यांच्या पत्नी यांना गंभीर दुखापत झाली. तसेच मुलीला किरकोळ जखम झाली. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिकेचे बापू गिरी व माऊली लाड हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरु असून पुढील कार्यवाही सुरु आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.