उरुळी कांचन, (पुणे) : समोर सत्तेची दादागिरी आणि धनशक्तीची ताकद उभी असताना, केवळ शरद पवारांवरील दृढनिष्ठेच्या बळावर आम जनतेने मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी लोकसभेत पाठवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनता माझ्यासोबत राहीली. हा विजय माझा नसून तमाम शिरूर लोकसभेतील मतदार बांधवांचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे केले यांनी केले.
जनतेने शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून दिले. त्याबदल शिरूर – हवेली महाविकास आघाडीच्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील रवींद्र कला मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी मारुती मंदिर ते रवींद्र कला मंदिर यादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, हवेलीचे जेष्ठ नेते के.डी. कांचन, देविदास भन्साळी, सोपान कांचन, प्रकाश मस्के, माधव काळभोर, संभाजी कांचन, राजेंद्र टिळेकर, सरपंच अमितबाबा कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, हवेलीचे तालुका अध्यक्ष संदीप गोते, शहराध्यक्ष रामभाऊ तुपे, अर्जुन कांचन, सुभाष टिळेकर, सागर कांचन, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुका अध्यक्षा सुरेखा भोरडे, शिवसेनेचे स्वप्निल कुंजीर, सविता कांचन, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा हा विजय आहे, कारण सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. मायबाप जनतेने पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हा विजय झाला आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी आणि इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, तसेच सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच विजयाचे गमक आहे, असं देखील कोल्हे म्हणाले.
दरम्यान, नव्या लोकसभेत २३४ विरोधी खासदार असल्याने सरकारला दर दिवशी अविश्वासाला सामोरे जावे लागेल. तसेच महाराष्ट्रात १५८ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याने, १२० दिवसानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत १८५ आमदारांना निवडून देऊन महाराष्ट्रातील सरकार बदलण्याचे काम शेतकरी व गोरगरीब जनतेच्या हितासाठी आपल्याला करायचे, असल्याचे कोल्हे म्हणाले. यावेळी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, के.डी. कांचन, देविदास भन्साळी, भारती शेवाळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ तुपे यांनी केले.