पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अजय तावरे याचे वेगवेगळे कारनामे समोर येऊ लागले आहेत. डॉ. तावरे हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रियेसाठी पैसे उकळत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून रुग्ण ससूनमध्ये येत असतात. ससून रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून तावरेने लाखो रुपये आतापर्यंत उकळले असल्याचे सुद्धा तपासात समोर आले आहे.
ससून रुग्णालयात पिंपरी चिंचवड, पुणे शहर, ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येत असतात. तसेच विविध जिल्ह्यांमधील रुग्ण देखील ससून रूग्णालयात पाठवले जातात. विशेषता: पश्चिम महाराष्ट्रामधून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण यामध्ये अधिक आहे. ससूनमध्ये एखादी नियोजीत शस्त्रक्रीया करण्यासाठी ३० ते ४५ दिवसांचा कालावधी रुग्णांना दिला जात असतो. मात्र, अनेकदा काही रुग्ण गंभीर असतात. तेव्हा त्यांचे नातेवाईक हतबल झालेले असतात. आपल्या माणसाला काही होऊ नये अशी त्यांची भावना असते. तेव्हा, त्यांना शस्त्रक्रियेसाठी लवकर वेळ मिळत नाही.
परंतु अशावेळी जर कोणी डॉ. तावरेला जाऊन भेटले तर अवघ्या दोनच दिवसांत शस्त्रक्रिया पार पाडल्या जायच्या. विशेषत: परजिल्ह्यामधून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रिया लवकर करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले जात. हे सारे व्यवहार करून देण्यासाठी डॉ. तावरे याने काही जिल्ह्यात दलालदेखील नेमले होते. त्या दलालामार्फत रुग्ण आल्यानंतर त्याला ससूनमध्ये सुविधा प्राप्त होत होत्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
१९ मे रोजी कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघातात दोघांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्यासंबंधी असणारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये डॉ. तावरे हा प्रमुख सल्लागार होता. त्याने आरोपीच्या वैद्यकीय तपासणीला ससून रुग्णालयात आणले असता डॉ. तावरे याने डॉ. श्रीहरी हाळनोर याला त्याचे रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते.
डॉ. तावरे याला इस्टेट एजंट असलेल्या अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी रक्त बदलण्यास सांगितले. त्याकरिता तीन लाख रुपये देखील देण्यात आले होते. हा प्रकार गुन्हे शाखेने उघड करीत डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, गायकवाड यांना अटक केली. यामध्ये विशाल अगरवालचा देखील सहभाग होता. ससूनचा शिपाई अतुल घटकांबळे याला बाल न्यायमंडळाच्या परिसरात तब्बल ४ लाख रूपये दिल्याचा प्रकार आता समोर आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.