मुंबई : विक्रोळी पश्चिमेकडे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लोखंडी सळ्या आणि सज्जाचा भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. रविवारी ९ जून रोजी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. नागेश रेड्डी (वय-३८) आणि रोहित रेड्डी (वय-१०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विक्रोळी पश्चिमेकडील टाटा पॉवर, कैलास बिझनेस पार्कजवळ पाच मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. नागेश रेड्डी हे या इमारतीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रात्री साडे अकराच्या सुमारास नागेश रेड्डी हे कामावर आले होते.
तेव्हा त्यांचा दहा वर्षाचा मुलगा रोहित हा त्यांचा जेवणाचा डबा घेऊन तिकडे आला होता. मात्र, जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले. याच दरम्यान अचानक या इमारतीचा काही स्लॅब आणि लोखंडे ढाचा थेट त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वीच दोघा जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.