लोणी काळभोर : लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील ५ दिवसांत ५ घरफोड्या करून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन गावांमधून फिरत असल्याची व त्याद्वारे टेहेळणी करून चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावांमध्ये रंगत आहे. ड्रोनचे गूढ वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सोरतापवाडी येथे एक व कुंजीरवाडी येथे दोन घरफोड्या झाल्याची घटना सोमवारी (ता. 27) मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडल्या होत्या. ही घटना घडण्याच्या अगोदर नागरिकांना या भागात अवकाशात ड्रोन कॅमेरे फिरताना दिसले होते. तेव्हा नागरिकांनी ड्रोनचा पाठलाग केल. मात्र, त्यांना ड्रोन सापडला नाही. हा ड्रोन घरापासून सुमारे 300 ते 400 फूट उंचीवरून फिरत असून ‘लेझर लाईट’ प्रमाणे त्याचा उजेड पडत आहे. ड्रोनने रेकी करूनच या घरफोड्या झाल्याचा संशय नागरिकांना आहे.
उरुळी कांचन, कुंजीरवाडी व सोरतापवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोडी करून मौल्यवान वस्तूंच्या चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. चोरटे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून घरात किती व्यक्ती आहेत, हे तर तपासत नाही ना? हालचालींवर लक्ष्य ठेवण्यासाठी ते ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करीत असावेत, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहे. हे ड्रोन कॅमेरे आहेत की आणखी दुसरे काही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांचा पोलीसांनी छडा लावावा, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
दरम्यान, बारामती व भिगवण परिसरात मागील १५ दिवसांपासून रात्रीच्या वेळी कोणत्याच प्रकारची परवानगी नसलेला ड्रोन अनधिकृतपणे घिरट्या घालत होता. आता कुंजीरवाडी व सोरतापवाडी परिसरात रात्री दहानंतर ड्रोन फिरत असून याची कोणतीच अचूक माहिती कोणत्याच प्रशासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. या ड्रोनची प्रत्येक गावात जोरदार चर्चा असून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. पण, हा ड्रोन रेकी करताना नागरिकांना आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये साशंकता व भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता या ड्रोनचा लवकर शोध लावावा, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांनी केली आहे.
कुंजीरवाडी परिसरात नागरिकांची गस्त सुरु
कुंजीरवाडी परिसरात चोर दिसून आल्याचे समजल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. गावातील तरुण वर्गाने चोरांचा पाठलाग ही केला, पण चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. अवकाशात ड्रोन उडताना दिसला की, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन दुचाकीवर बसून ड्रोन चालकाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अवकाशात फिरणाऱ्या ड्रोनसदृश्य वस्तूमुळे तरुणांनी गल्ली गल्लीत रात्रीचे गस्त सुरु केले आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सोरतापवाडी व कुंजीरवाडी येथील घरफोड्यांमधील चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. मात्र, पोलिसांना अद्यापही त्यांना पकडण्यास अपयश आले आहे. पोलीस तपासाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हे
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या, चोरी व हाणामारी झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला आहे की नाही, अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोड्या होत आहेत. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु आहेत. मात्र, उरुळी कांचन व लोणी काळभोर पोलीस काहीच झाले नसल्याचा आव आणत आहेत.
खबऱ्यांचे नेटवर्क संपले का?
मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.