उरुळी कांचन, (पुणे) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा उचकटून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आळंदी म्हातोबा गावाकडे जाणाऱ्या वायकर वस्ती परिसरात सोमवारी (ता. 27) मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सुनील पांडुरंग पडवळ (माजी मुख्याध्यापक, पुरोगामी माध्यमिक विद्यालय, सोरतापवाडी. ता. हवेली) यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पांडुरंग पडवळ हे कुटुंबीयासोबत सोरतापवाडी परिसरात राहतात. तर त्यांचा एक मुलगा अमर पडवळ मुंबईतील मालाड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांचा दुसरा मुलगा रजनीकांत यांची स्पोर्ट्स अकॅडमी असून त्यानिमित्त मुलांना घेऊन ते सातारा जिल्ह्यातील पाचगणी या ठिकाणी गेले होते.
काही कामानिमित्त सुनील पडवळ व घरातील सर्वजण दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरटे घरामध्ये घुसले. घरातील सर्व साहित्य हे अस्तव्यस्त फेकून दिले. तसेच घरातील कपाट व इतर साहित्यांची नासधूस केली. घरातील लहान मुलांच्या सोन्या चांदीच्या व काही मोठ्या वस्तू लंपास केल्या आहेत.
दरम्यान, पडवळ यांच्या शेजारी असलेल्या घरांना या चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्या होत्या. शेजारी असलेल्या एका घराच्या छतावरून खाली उतरताना एका ठिकाणी रक्त आढळून आले आहे. सोमवारी (ता. 27) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच तपासाबाबत श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.