पुणे : वारस म्हणून नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या नावाने तीन हजार रुपये लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. बारामती शहरातील तलाठी कार्यालयाच्या बाहेर शुक्रवारी (ता. १७) ही कारवाई करण्यात आली आहे.
चंद्रकांत परबत जावळकर (वय-50 रा. कुंभारवस्ती, कसबा ता. बारामती) असे लाच घेताना पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या सासऱ्यांच्या नावावर बारामती शहरातील कसबा येथे जागा आहे. सासऱ्यांच्या नावावर असलेल्या जागेवर पत्नीच्या नावाची वारस म्हणून नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी बारामती तलाठी कार्य़ालयात अर्ज केला होता. वारस नोंद करण्यासाठी खासगी व्यक्ती चंद्रकांत जावळकर यांनी तलाठी यांच्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पडताळणी केली असता, खासगी व्यक्ती चंद्रकांत जावळकर याने तलाठी यांच्याकरीता तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या पत्नीची वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली. जवळकर याने तडजोडी अंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच स्वीकारताना चंद्रकांत जावळकर याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.