अलिबाग : कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात विशेषतः लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. गतवर्षी एप्रिल महिन्यात गुरुचा अस्त असल्याने अनेकांनी मे महिन्यात विवाह उरकले. यंदा मात्र, मे आणि जून महिन्यात दोनच मुहूर्त सोडले तर २९ जूनपर्यंत मुहूर्त नाहीत. त्यामुळे लग्नसराईला ५८ दिवसांचा ब्रेक लागला आहे. या वर्षी लग्नसराईची धामधूम सुरू आहे, सोयरीक जुळवणे आणि विवाह आनंदाने पार पाडण्यासाठी वधू-वरांचे आई-वडील तयारी करू लागले आहेत; परंतु यंदा वैशाख महिन्यात गुरू आणि शुक्राचा अस्त असल्याचे सांगितले जात असल्याने विवाह जमण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जवळपास ५८ दिवसांचा खंड पडणार आहे. काही पंचांगामध्ये गुरू शुक्राचा अस्त असल्याचे कारण दाखवत २ मे २०२४ या तिथीनंतर सरासरी दोन महिने विवाह मुहूर्त दिले गेले नाहीत.
त्यामुळे नेमके जुळवण्यात आलेल्या विवाहातील वधू-वरांची ओढाताण होत असल्याचे दिसत आहे. २ मे ते २९ जून रोजीदरम्यान लग्नमुहूर्त नाहीत, तर काही पंचांगात मात्र धर्मग्रंथाचा आधार घेत अडचणीच्या प्रसंगी गुरू, शुक्र अस्तामध्येसुद्धा विवाह मुभा दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान, २ मेनंतर मुहूर्त कालावधी टप्पा मोठा असल्याने अनेक वधू-वर मंडळींनी २ मे रोजी विवाह आटोपले आहेत.