वाघोली : पुण्यातील वाघोली परिसरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. गरम जास्त होत असल्याने हॉलमधील खिडकी अर्धवट उघडी ठेवून घरातील कुटुंबीय झोपी गेले होते. याचाच फायदा घेत खिडकीतून सदनिकेचा दरवाजा उघडून चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. ही घटना वाघोलीतील कोलवडी येथील श्री संत रोहिदास नगर येथे घडली. तर अशीच एक घटना वाघोली येथील गेरा वल्ड ऑफ जॉय सोसायटीत घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या दोन्ही प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, वाघोली येथील गेरा सोसायटीच्या फ्लॅटमधील पती-पत्नी सायंकाळी उशिरा क्लबहाऊसमध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले होते. घरी कोण नसल्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून बॅगमध्ये ठेवलेले ७.२ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. पती पत्नी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी धीरेंद्र देवडा यांनी फिर्याद दिली आहे.
कोलवडी येथील दुसऱ्या घटनेमध्ये गरम जास्त होत असल्याने हॉलमधील खिडकी अर्धवट उघडी ठेवून घरातील कुटुंबीय झोपी गेले होते. मध्यरात्री घरातील महिलेला जाग आल्यानंतर हॉलचा दरवाजा उघडा व हॉलमधील साहित्य अस्ताव्यस्त झालेले दिसले. घरातील साहित्य तपासले असता कपाटात ठेवलेले ३.५ तोळ्याचे दागिने, पैंजण व रोख २२ हजार चोरट्यांनी चोरून नेले होते. खिडकीतून सदनिकेचा दरवाजा उघडून चोरीकेल्याप्रकरणी अशोक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.