पिंपरी: मुलाला शाळेत सोडविण्यासाठी निघालेल्या महिलेच्या दुचाकीला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी २४ एप्रिलला सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील राम कृष्ण हरी चौक, चिखली येथे घडला.
जयश्री पंकज खोपे (वय ३०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैभव भानुदास आगरकर (वय २६, रा. वारजे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मामे बहीण जयश्री खोपे या त्यांच्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या देहू-आळंदी रोडवरील राम कृष्ण हरी चौकात आल्या असता त्यांच्या दुचाकीला भरधाव आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत जयश्री खोपे आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले. त्यामध्येच जयश्री यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने अपघातस्थळी न थांबता पलायन केले. या प्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.