लोणी काळभोर : एखाद्या दुर्घटनेमध्ये व्यक्तीचे अथवा बालकाचे हृदय बंद पडले, श्वास घेता येत नसेल तर त्याचे प्राण वाचविणे गरजेचे असते; पण यासाठी काय करावे याची माहिती असणे गरजेचे असते. यासाठी जीवनरक्षक प्रथमोपचार पद्धत उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम उपचार पद्धतीचे ज्ञान असणे गरजेचे असते, असे पुणे येथील साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राध्यापिका नमिता पाठक यांनी केले आहे.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा सेविकांसाठी जीवन रक्षक प्रथमोपचार प्रशिक्षणाचे गुरुवारी (ता.18) आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राध्यापिका नमिता पाठक बोलत होत्या. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली भंगाळे, डॉक्टर डी.जे. जाधव, प्राध्यापिका रूपाली शिंदे, शोभा पाटील, स्मिता पाडळे, विद्या आढाव, सिद्धी पिसाळ, आशा सेविका व साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्राध्यापिका पाठक म्हणाल्या की, ‘व्यक्तीचे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्यास तीन ते पाच मिनिटांच्या आत सुरू करणे गरजेचे असते. अन्यथा ती व्यक्ती ब्रेन डेड होण्याची शक्यता असते. वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईपर्यंत अशा परिस्थितीत रुग्णावर तातडीने जीवनरक्षक उपचार सुरू करणे गरजेचे असते. मात्र, या उपचार पद्धतींच्या अज्ञानामुळे ते रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांच्या जीवाला निर्माण झालेला धोका अधिकच बळावतो’.
‘हृदयक्रिया बंद पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन तसेच एईडी नामक यंत्राचा वापर करून हृदयक्रिया कृत्रिमरित्या चालू ठेवता येऊ शकते. यामुळे रुग्ण बचावण्याची शक्यता वाढत असते. यासाठी या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण असणे गरजेचे असते’, असेही प्राध्यापिका पाठक यांनी सांगितले.
दरम्यान, साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या 27 विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थिनींनी काही प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यानंतर आशासेविकांनी प्रात्यक्षिक करून दाखविली.