बारामती, (पुणे) : इन्स्टाग्रामच्या स्टेटसवरुन पिस्तूलाची देवाणघेवाण करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आकाश शेंडे (सावळ, ता. बारामती), रोहित वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर) आणि सागर भिंगारदिवे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपींचा साथीदार ओंकार महाडीक (रा. बारामती) हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळ येथील आकाश शेंडे याने इन्स्टाग्रामला धारदार कोयत्याचे स्टेटस ठेवल्याचे फौजदार राजेश माळी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आकाश शेंडे याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याच्याकडे पिस्तूल असलेले फोटोही पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर आकाश शेंडे याने त्याचा साथीदार रोहित वणवे याच्याकडे पिस्तूल दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रोहित वणवे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल आणि एक मोकळी पुंगळी सापडली. तपासात रोहित वणवे याने हे पिस्तूल सागर भिंगारदिवे (रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याच्याकडून दोन महिन्यांपूर्वी विकत घेतल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीस पथकाने सागर भिंगारदिवे याच्याकडे चौकशी केली असता ते पिस्तूल ओंकार महाडीक याच्याकडून घेतल्याचे सागरने सांगितले. पोलिसांनी ही साखळी जोडली असून आता ओंकार महाडीक याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आकाश शेंडे, रोहित वणवे व सागर भिंगारदिवे यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी किती जण सहभागी आहेत याचा तपास अधिक वेगाने सुरु केला आहे.
ही कामगिरी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश माळी, फौजदार गणेश पाटील, दत्तात्रय लेंडवे, राम कानगुडे, अतुल पाटसकर, बापू बनकर, अमोल नरुटे, तुषार लोंढे यांनी ही कामगिरी केली.