कोल्हापूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकाचे वारे वाहू लागले आहे. कोल्हापूरमध्ये ‘मविआ’ कडून शाहू महाराज छत्रपती, तर ‘महायुती’कडून खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट सामना रंगणार आहे. एकीकडे शाहू महाराजांना शह देण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
अशातच शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल आहे. त्यामुळे केलेल्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताचे महाराज हे खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आहेत. कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं विधान संजय मंडलिक यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
काय म्हणाले संजय मंडलिक?
कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नेसरी येथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही, मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो. यानिमित्ताने सांगितले पाहिजे की, आताचे महाराज साहेब आहेत. हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार, असं संजय मंडलिक म्हणाले.
तसेच माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पूर्वगामी विचार जपला. ही शाहू महाराजांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार दिला. इथे राहणारा प्रत्येक माणूस शाहू विचार घेऊन जगतो, असंही संजय मंडलिक यावेळी म्हणाले.