बुलढाणा : बुलढाण्यातील जवळा बुद्रुक येथे शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकांकडे तक्रार केली, नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला. हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने ८ वर्षाच्या मुलाची पँट उतरवून लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना येथे घडली आहे. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमक काय घडल?
शुक्रवारी शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मार्च रोजी केळीचे वाटप करण्यात आले होते. वाटप दरम्यान एका विद्यार्थ्याला खराब केळी दिली. याची तक्रार त्याच्या वडिलांकडे केली होती. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी याबाबत मुख्याध्यापिकेला मुलाला खराब केळी का दिली? असा जाब विचारला. हाच राग मनात धरून मुख्याध्यापिकेने शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याला माझ्याबद्दल तक्रार करतो का? माझी बदली करायला लावतो का? असे म्हणत ८ वर्षीय विद्यार्थ्यांची पॅन्ट उतरवून अश्लील चाळे केले.
दरम्यान, या घटनेमुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेमधून घरी जाण्यासाठी पळत सुटला. पळताना तो शाळेच्या आवारात पडल्याने त्याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला आहे. घडलेला प्रकार पीडित विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जवळा बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.