यवत : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणकोबावाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशाली आबणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम सर्व थोर महिलांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रांजल पवार, संगीता वाळके, निलिमा कांचन, रेणुका कांचन उपस्थित होत्या. मुख्याध्यपिका स्वाती माने यांनी उपस्थित मान्यवारांचे स्वागत केले. यावेळी वैशाली आबणे म्हणाल्या, ‘महिलांनी आपल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ चूल आणि मूल यातून बाहेर पडून आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.
दौंड येथील डॉ. प्रांजल पवार यांनी देखील महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आहार आणि आरोग्याविषयी जागरूक राहिले पाहिजे. कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले. महिलांचे सबलिकरण याविषयी बोलताना शिक्षिका संगीता वाळके यांनी महिलांना विविध शासकीय योजनाची माहिती दिली. तसेच आज सर्वच क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर करून महिलांनी आपली प्रगती करावी, असे आवाहन उपस्थित महिला व तरुणी यांना केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी मुलींना शिक्षणातील विविध संधी याविषयी माहिती दिली. मुलगी शिकली, प्रगती झाली हे लक्षात घेऊन आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्या, मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलीच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहन उपस्थित महिलांना केले. यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे, हत्तीला शेपूट काढणे, चित्रातील महिलेला टिकली लावणे यासारखे खेळ घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विक्रम लांडगे यांनी केले तर संदीप साळवे यांनी उपस्थित मान्यवारांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर बापू खताळ, यवत ग्रामपंचायत सदस्या नंदा बिचकुले, सामाजिक कार्यकर्ते मल्हारी बिचकुले, मारुती बिचकुले, धुळा भिसे, अंगणवाडी सेविका सुवर्णा शिवतरे, मदतनीस लालूबाई गायकवाड यांच्यासह पालक, तरुणी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी महाजन, विस्तार अधिकारी खैरे व केंद्रप्रमुख पवार यांचे मार्गदर्शन लाभले.