केंद्र सरकारच्या वा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी बँकेत खाते असणे गरजेचे आहे. त्यामुळेच देशातील बहुतांश लोकांनी बँकेत सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते उघडले आहे. पण बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याची सोय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बँका बचत खात्यावर ज्या दराने व्याज देतात त्यापेक्षा अधिक व्याजदर पोस्टाच्या बचत खात्यावर दिला जातोय.
पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज – 4.0 टक्के
एसबीआय बचत खात्यावरील व्याज- 2.70 टक्के
पीएनबी बचत खात्यावरील व्याज- 2.70 टक्के
बीओआय बचत खात्यावरील व्याज- 2.90 टक्के
बीओबी बचत खात्यावर व्याज- 2.75 टक्के
एचडीएफसी बचत खात्यावरील व्याज- 3.00 टक्के ते 3.50 टक्के
आयसीआयसीआय बचत खात्यावरील व्याज- 3.00 टक्के ते 3.50 टक्के
तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडत असलात तरी सर्व ठिकाणी तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे आहे, अन्यथा दंड भरावा लागतो. साधारणपणे बँकांमधील नियमित बचत खात्यावर किमान शिल्लक मर्यादा किमान 500 ते 1000 रुपये असते. परंतु पोस्ट ऑफिस बचत खाते किमान 500 रुपयांमध्ये उघडता येते.
इतर बँकेप्रमाणेच तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावरही अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. खाते उघडल्यावर तुम्हाला चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग, आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात. याशिवाय तुम्ही या खात्यावर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता.
पोस्टात बचत खात्याशी संबंधित इतर कोणता खर्च आहे?
पोस्ट ऑफिस बचत खात्यातील रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असल्यास आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी ती या मर्यादेपेक्षा कमी राहिल्यास, 50 रुपये देखभाल शुल्क वजा केले जाते.
डुप्लिकेट पासबुक जारी करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
खाते विवरण किंवा जमा पावती जारी करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये भरावे लागतील.
खाते हस्तांतरण आणि खाते तारण यासाठी प्रत्येकी 100 रुपये खर्च येतो.
नामनिर्देशित व्यक्तीचे नाव बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतात.
एका वर्षात तुम्ही 10 चेकबुकची पाने कोणत्याही शुल्काशिवाय वापरू शकता आणि त्यानंतर प्रत्येक पानासाठी 2 रुपये शुल्क आकारले जाते.