कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचा कोल्हापुरात महाअधिवेशन सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आरसा पहावा, बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी तोंडात नारा, मनगटात मेहनत असावी लागते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा चांगालच समोचार घेतला.
एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, शिवसेनेसाठी अनेक शिवसैनिकांनी घरावर तुळसीपत्र ठेवले. आणि हे आले पीठावर आयत्या रेगोट्या मारतायत, पण त्या सुद्धा नीट मारता आल्या नाहीत. नारायण राणे, राज ठाकरे यांचा तुम्हाला काय त्रास होता? एखादा चांगला भाषण करायला लागला की त्यांचे भाषण कट करु लागले. दोन चार टकल्यांना सोबत घेवून पक्ष मोठा होत नाही. आपली लोकं मोठी होत होती हे तुम्हाला नको होते. एकमेकांना झुंजवत होते, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचावरून शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या वेळी जर युती झाली असती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. मी त्यांना बोललो होतो युती करा. झालेली चूक सुधारु. पाच वेळा त्यांना सांगितले आपण युती केली पाहिजे. शेवटी मला ते म्हणाले पुढील जी काय अडीच तीन वर्षे आहेत ते ती आपल्याला देतील. पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. शिवसेनेचे काहीही होवू दे. असा नेता मी कधीच पाहिला नाही.
सरकारमध्ये काम करत असताना आलेल्या अडचणी विषयी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेव्हा गडचिरोलीत काम करत होते, तेव्हा पोलीस बोलले आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी बोललो नक्षलवाद मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. 10 हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्ट घेतले असून हजारो रोजगार मिळतील. मी कधीच कोणाला घाबरत नाही दाऊद आला शकील आला पण मी कोणाच्या धमकीचा घाबरत नाही.
शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण यांनी तर काँग्रेसला मांडीवर घेवून बसले. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितलं नाही.