नवी दिल्ली: चंदीगडच्या महापौर निवडणुकीत झालेल्या अफरातफरीवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. यादरम्यान निवडणूक अधिकाऱ्याचा नगरसेवकांची मते बाद करतानाचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड चांगलेच संतापले. ही लोकशाहीची थट्टा असून जे काही घडले ते पाहून स्तब्ध झालो आहोत. अशाप्रकारे लोकशाहीची हत्या करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, अशा शब्दांतसरन्यायाधीशांनी सुनावले आहे. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी चंद्रचूड यांनी निवडणूक अधिकाऱ्यार खटला चालविला पाहिजे, असे म्हटले. याचबरोबर महापौर निवडणुकीचा पूर्ण व्हिडीओ सादर करण्यास सांगत नोटीस देखील जारी केली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व रेकॉर्ड सुरक्षित करण्याचे आदेश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टच्या रजिस्ट्रार जनरल यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीत मोठी अफरातफर करण्यात आली होती. यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून आला होता. निवडणूक अधिकारीच नगरसेवकांची मते बाद करत असल्याचा व्हिडीओ निवडणुकीनंतर व्हायरल झाला होता. याविरोधात कुलदीप कुमार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली. व्हायरल व्हिडीओमुळे सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणुकीतील हेराफेरी निदर्शनास आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे निवडणुकीचे सर्व कागदपत्रे आणि व्हिडीओ जमा केले जाणार आहेत. तसेच महापालिकेची ७ फेब्रुवारीला होणारी पहिली सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.