जुन्नर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मग भाजप का चालत नाही? अशी विचारणा केली. वरिष्ठांनी निर्णय घेतलेला चालतो आणि कनिष्ठांनी घेतलेला का चालत नाही? असा थेट प्रश्न खासदार शरद पवारांना उद्देशून केला.
अजित पवार म्हणाले की, 1995 मध्ये मी फक्त आमदार होतो. आघाडीचे सरकार त्यावेळी कोसळलं. 1999 साली परदेशी व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं, अशी भूमिका वरिष्ठांनी घेतली. अगदी सहा महिन्यांत आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परदेशी नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं, परदेशी व्यक्तीचं धोरण? आजवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजपचाही मुख्यमंत्री झाला, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आरआर पाटील, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आले असते, मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं मग भाजप सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं? वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत? अशी विचारणा देखील त्यांनी केली.