पांचगणी, (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे विहिरीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) असं त्या ठेकेदाराचं नाव आहे. या घटनेने गोडवली गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडवली या गावातील तानाजी आबाजी मालुसरे (वय ५८) हे गेल्या अनेक वर्षांपासून विहीर खोदणे, गाळ काढणे अशी विविध कामे करत होते. गोडवली गावात विहिरीचे काम चालू असताना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाय अचानक घसरला आणि तोल जाऊन ते विहिरीत पडल्याने त्यांच्या डोक्याला, हात, पायाला आणि इतर ठिकाणी जबर मार लागल्याने बेशुद्ध पडले.
यानंतर तातडीने त्यांना तेथील कामगार व गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पांचगणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे हवालदार कैलास रसाळ करत आहेत.