उरुळी कांचन (पुणे) : ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने येथील बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी बुलेट, दुचाकी अशी मोठमोठी बक्षिसे ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू लागल्याचे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.
श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून दौंडचे आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून रायबान ग्रुप, शिंदवणे सोसायटीचे संचालक सचिन मचाले व उद्योजक सागर म्हस्के यांच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ‘आमदार हिंदकेसरी २०२४’ या भव्य बैलगाडा शर्यतींचे (ओपन मैदान) आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार कुल बोलत होते.
‘आमदार हिंदकेसरी २०२४’च्या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये विविध भागांतून ३०६ गाड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मोहिल धुमाळ, दैवत गोवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले घोटावडे (मुळशी) येथील खानेकार बंधू, तर सुभाषतात्या मांगडे यांच्या बैलगाड्याने तृतीय क्रमांक पटकावला. चतुर्थ क्रमांक गौतमभैया काकडे तर पाचवा क्रमांक पिंटूशेठ मोडक व सहावा क्रमांक नंदू सागडे, समीरभैया इस्लामपूर यांनी पटकावला. स्पर्धेत प्रथम आलेल्यांना बुलेट, सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उर्वरित विजेत्यांना मोटारसायकल, रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सारिका हरगुडे, संचालक प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी, माजी उपसरपंच सागर नाना कांचन, तसेच या स्पर्धेसाठी गुरुनाथ मचाले, अजय पवार, गणेश मेमाणे, पोपट महाडीक, ओंकार मांढरे, तुषार कांचन, ऋतुराज महाडिक, शिवाजी महाडीक, बापू खेडेकर, अभिजित महाडीक, राहुल कड, भीमराव शितोळे, विक्रम शितोळे, शांताराम महाडीक, किरण महाडीक, जगदीश महाडिक, विजय मचाले, मिनिनाथ महाडिक, यांनी सहकार्य केले तर सागर कांचन यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन उपस्थित होते.
याबाबत बोलताना आयोजक सचिन मचाले म्हणाले, “शर्यतीच्या निमित्ताने लावली जात असलेली छोटी-मोठी दुकाने, बैलांना सजवण्याच्या वस्तू विकणारे व्यापारी, शेती उपयोगी वस्तू विकणारे विक्रेते, चहा-पाण्याची हॉटेल्स चालवणारे छोटे व्यावसायिक, बैलांच्या धावपट्ट्या तयार करणारे, बैलांची वाहतूक करणारे, वाजंत्री, आताच्या काळातील डीजेवाले, चारा विकणारे, असे छोटे-मोठे प्रत्येक व्यावसायिक या शर्यतीच्या अवतीभोवती जोडले जातात. त्यातून होणारी आर्थिक उलाढाल ही प्रत्येकासाठी मोलाची ठरते. मोठ्या शेतकऱ्यांकडे असलेला आर्थिक प्रवाह गरीब, कामकरी लोकांकडेही यानिमित्ताने प्रवाहीत होतो. यामुळे प्रत्येकवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.