पुणे :राज्याच्या अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. तर काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्याच्या काही भागात आठवड्याच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली होती. ऐन हिवाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांचं मोठं नुकसान झाल आहे. हवामान विभागाने देशासह राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं, बाष्पुक्त वाऱ्यांमुळं राज्यावर पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत. पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज शनिवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. यात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. त्याशिवाय, राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. परिणामी काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. निफाड, पाचगणीमध्ये तापमानाचा आकडा बराच खाली गेला आहे. पण, ही थंडी फार काळ टीकली नाही.
देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील या राज्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. रतलाम, शाजापूर, आगर-मालवा, देवास, उज्जैन, अशोकनगर, दतिया, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर. विदिशा, सिहोर, राजगढ, रायसेन, भोपाळ, नर्मदापुरम, हरदा आणि बैतूल येथे वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.