लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील रेशनिंग संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कासुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १ जानेवारीपासून रेशनिंग दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी रेशनिंग संघटनेच्या वतीने तहसीलदार, प्रांताधिकारी आणि वाई- खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रेशनिंग दुकानदारांना मिळणारे कमिशन हे तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या एक जानेवारीपासून सर्व रेशनिंग दुकानातील मशीन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामधून एकही पावती न काढण्याचा निर्णय सर्वानुमते संघटनेच्या वतीने महाबळेश्वर येथील श्री राम मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महाबळेश्वर तालुका रेशनिंग संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित कासुर्डे, उपाध्यक्ष सुनिल बावळेकर, सचिव प्रताप दाबेकर, किरण प्रभाले अजय तोडकर, बंडू धोत्रे, बापू शेलार, महिला जिल्हा संघटनाच्या सौ सुनंदा दुधाने, शुभम कुंभारदारे खजिनदार यांच्यासह रेशनिंग संघटनेचे विविध पदाधिकारी आणि दुकानदार उपस्थित होते.