सेंच्युरियन: टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावून टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी केली आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या साथीने संघाची धावसंख्या 245 धावांपर्यंत पोहोचवली. केएल राहुलने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले आणि 73.72 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
या सामन्यात केएल राहुल जेव्हा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेट गमावून केवळ 92 धावा होती. यानंतर टीम इंडियाने 121 धावांवर आपली सहावी विकेटही गमावली. पण त्यानंतर केएल राहुलने प्रथम शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शेवटी प्रसिद्ध कृष्णासोबत फलंदाजी केली. टीम इंडियाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेलं.
केएल राहुलच्या 8 शतकांपैकी दोन शतके दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन या जगातील सर्वात कठीण मैदानांपैकी एकावर झाली आहेत. केएल राहुलने सेंच्युरियनच्या मैदानावर सलग दुसरे शतक झळकावले. 2021 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सेंच्युरियन मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने सलामीवीर म्हणून 123 धावा करत शानदार शतक झळकावले. त्या सामन्यात भारताने 113 धावांनी शानदार विजय मिळवला आणि केएल राहुलही सामनावीर ठरला.
आता केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील याच मैदानावर सलग दुसरे शतक झळकावले आहे. केएल राहुल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या मैदानावर 2 शतके ठोकणारा जगातील पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांव्यतिरिक्त केएल राहुल हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने सेंच्युरियनच्या मैदानावर दोन कसोटी शतके झळकावली आहेत.