पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना गंगाधाम चौकाशेजारी फिरस्ता महिलेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या महिलेने शारीरिक संबंधासाठी नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात ९ डिसेंबर रोजी फिरस्ता महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी रविसिंग राजकुमार चितोडिया (वय २९), विजय मारुती पाटील (वय ३२) दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता दारूच्या नशेत त्यांनी रात्री फिरस्ता महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. मात्र, त्यास संबंधित महिलेने नकार दिल्याने आरोपींनी हातोडा मारून महिलेचा खून केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
तब्बल ५५ किमी अंतरावरील सीसीटीव्ही तपासणी
पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-५ कडून गुन्ह्याचा तपास केला जात होता. त्यावेळी घटनास्थळ ते चाकणपर्यंत साधारण ५५ किमी २४०-२५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.