National Crime Records Bureau : पुणे : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे अहवाल सध्या महाराष्ट्राला एकावर एक धक्के देत आहेत. भ्रष्टाचार, दंगली महाराष्ट्रात सर्वात जास्त होत असल्याचा अहवाल मागील काही दिवसांपूर्वी आला होता. सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान देशापुढे उभे असताना महाराष्ट्र या गुन्ह्यांत देशात दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सायबरच्या माध्यमातून महिलांच्या लैंगिक शोसनात महाराष्ट्रात सर्वात जास्त होत आहे. ही धक्कादायक बाब नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून समोर आली आहे. समोर आलेली आकडेवारी उत्तरप्रदेशच्या तुलनेतही जास्त आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी वाढली आहे. यात बॅंकेतील पैसे अधिक नफ्याच्या माध्यमातून वळवून त्यातून आर्थिक फसवणूक केल्या जात आहेत.
महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हेगारीत त्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये महिलांबाबत अश्लिल साहित्य पोस्ट करीत, त्यांची बदनामी करून त्यातून आर्थिक लुट करण्याचे काम केले जाते. महाराष्ट्रात यासंदर्भात ७८७ गुन्हे दाखल असून ते उत्तरप्रदेशच्या तुलनेतही जास्त आहे. विशेष म्हणजे महिलांसदर्भातील गुन्ह्यातही राज्य दुसऱ्या स्थानावर असून २ हजार ५३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.
महिलांसंदर्भातील सायबर क्राईम
कर्नाटक ३ हजार ९०४, महाराष्ट्रात २ हजार ५३०, आंध्र प्रदेशात ६३७,
महिलांचे लैंगिक शोषण
महाराष्ट्रात ७८७, उत्तर प्रदेशात ५४२, राजस्थान २७१.
महिलांची बदनामी करण्यावर सायबर गुन्हेगारांचा रोख असल्याचे दिसून येते. यात ब्लॅकमेलिंग, फेक प्रोफाइल आणि सायबर गुंडगिरीच्या माध्यमातूनही महिलांना टारगेट केले जात आहे. राज्यातील महिलांवर सायबरच्या माध्यमातून लैंगिक अत्याचारात वाढ झालेली आहे हे दिसून येते. त्यांच्याबाबत समाजमाध्यमांवर अश्लील साहित्य टाकण्यासंदर्भात ७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
महिलांसंदर्भातील इतर गुन्हे
ब्लॅकमेलिंग ११, अश्लील साहित्य टाकणे ७५, सायबर गुंडगिरी ५७८, बदनामी करणे ३, फेक प्रोफाइल २७, इतर १,८३६ अशा एकूण २,५३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.